हवी ती चौकशी करा, दोषींवर कारवाई करा : आ. अभय पाटलांचे आव्हान
Voiceofbelgaum news : स्मार्टसिटी योजनेच्या कामात काही गैरप्रकार झालाय असे वाटत असेल तर कोणत्याही यंत्रणेकडून चौकशी करा अन दोषींवर कारवाई करा असे आव्हान बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी दिले.जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव महापालिका सभागृहात आज प्रगती आढावा बैठक घेतली. त्यावेळी काहींनी स्मार्टसिटी प्रकल्पाच्या कामांवर आक्षेप घेतला. त्यावेळी बोलताना आमदार अभय पाटील यांनी हे आव्हान दिले. बेळगाव दक्षिणलाच स्मार्टसिटी योजनेचा सर्वाधिक निधी मिळाल्याच्या आक्षेपावर बोलताना, स्मार्टसिटीचा एक हजार कोटी रुपयांचा निधी आला असला तरी त्यापैकी केवळ 430 कोटी रुपये निधी बेळगाव दक्षिणेला मिळाला आहे. त्यातून चांगली विकासकामे केली आहेत असे त्यांनी सांगितले. अनिल बेनके आणि मी निवडून आल्यावर ऍक्शन प्लॅनमध्ये आम्ही काही दुरुस्त्या केल्या त्या कायद्याला धरूनच आहेत. आता तर आमचे सरकार नाही. राज्यात योग्य सरकार आले आहे. स्मार्टसिटीची कामे कायद्याला धरून निविदा मागवुनच केली आहेत. कामात काही शंका, आक्षेप असेल तर कोणत्याही यंत्रणेकडून चौकशी करा, गैरप्रकार झाले असतील तर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा असे त्यांनी सांगितले.