बेळगाव ग्रामीणमध्ये चित्रा वाघांसमोरच रंगला भाजप कार्यकर्त्यांमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; खासदार अन् इच्छूक उमेदवाराला कोसळले रडू
बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी माजी आमदार संजय पाटील यांच्यासह धनंजय जाधव इच्छुक होते. मात्र...
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नागेश मन्नोळकर यांच्या निवडणूक प्रचारासाठी आयोजित करण्यत आलेल्या बैठकीत महाराष्ट्र भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांचा हायव्होल्टेज ड्रामा रंगला. ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांना उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्त्यांनी बैठकीत तीव्र शब्दांत रोष व्यक्त केला. या वेळी खासदार इराण्णा कडाडी आणि जाधव यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. बेळगावमधील धर्मनाथ भवन येथे भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी माजी आमदार संजय पाटील यांच्यासह ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव इच्छुक होते. मात्र, माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून मन्नोळकर यांना भाजपची उमेदवारी मिळवून दिली. त्याचे पडसाद चित्रा वाघ यांच्या बैठकीत पहावयास मिळाले.
चित्रा वाघ यांच्या बैठकीला उमेदवार मन्नोळकर यांच्यासह माजी मंत्री रमेश जारकीहोळी, माजी आमदार संजय पाटील, खासदार इरण्णा कडाडी, धनंजय जाधव आदी सर्व नेते एकाच व्यासपीठावर आले होते. बैठकीला सुरुवात होताच धनंजय जाधव यांच्या काही समर्थकांनी उभे राहून आपला रोष व्यक्त केला. बैठकीतील हा हायव्होल्टेज ड्रामा बराच वेळ रंगला. या गोंधळावेळी कडाडी आणि जाधव यांना अश्रू अनावर झाले. बैठकीत दोघेही डोळे पुसत बसले होते. या वेळी वाघ आणि जारकीहोळी यांनी कार्यकर्त्यांना शांत करत एकजुटीने निवडणुकीत भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांच्या या गोंधळातच माजी आमदार पाटील, जाधव यांनी भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्न करु, असे जाहीर केले.
बेळगाव जिल्ह्यातील 15 मतदारसंघात भाजपला विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी संकल्प करावा. केवळ लक्ष्मी हेब्बाळकर यांना पराभूत करणे नव्हे; तर भाजपला विजयी करायचे आहे. आपण सर्वजण एकत्र आलो, तरच भाजपचा विजय निश्चित आहे, असे माजी मंत्री रमेश जारकीहोळी या वेळी सांगितले.