विकलांग विद्यार्थ्यांनी जिद्द आणि अथक परिश्रमाच्या बळावर जीवनात प्रगती साधावी : किरण जाधव
बेळगाव, दिनांक 8 voiceofbelgaum news : अपंगत्वाचा बाऊ न करता परिस्थितीवर मात करीत अनेक विकलांगानी यशोशिखरे गाठलेली आहेत. अशा लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य विकलांगांनी जिद्द आणि अथक परिश्रमाच्या बळावर जीवनात प्रगती साधावी आणि आपल्या पालकांचे ऋण फेडावेत असे भाजप राज्य ओबीसी युवा मोर्चाचे सचिव आणि सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव म्हणाले.
अळवन गल्ली, शहापूर येथील द असोसिएशन ऑफ ड फिजिकली हॅंडीकॅप्ड संस्थेच्या एपीएच स्पोर्ट्स क्लब या क्रीडा भवनात विकलांग टेबल टेनिस क्रीडापटूंसाठी सुरू करण्यात आलेल्या टेबल टेनिस कोर्टचे उद्घाटन केल्यानंतर किरण जाधव बोलत होते.
इंदोर येथे होणाऱ्या बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत बेळगावच्या विकलांग बॅडमिंटनपटूंची निवड झाली आहे. या बॅडमिंटनपटूंचा किरण जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी किरण जाधव यांनी इंदोर बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत निवड झालेल्या बॅडमिंटनपटूंना शुभेच्छा दिल्या.
विकलांग किडापटूंनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवावे, पॅरा ऑलिम्पिकपर्यंत त्यांनी मजल गाठावी आणि कुटुंब व समाजाचे नाव लौकिक करावे यासाठी शासनाकडून प्रामाणिक प्रयत्न झाले पाहिजेत. तसेच बारावीपर्यंत गुणात्मक शिक्षण घेतलेल्या विकलांग विद्यार्थ्यांना शासनाने त्वरित नोकरीची सोय उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून ते स्वबळावर उभे राहतील आणि आर्थिक रित्या सबळ होतील असेही किरण जाधव म्हणाले.
यावेळी किरण जाधव यांच्यासमोर विकलांग विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या आणि अडीअडचणी मांडल्या. त्यांच्या अडचणी शासकीय पातळीवर सोडविण्याची ग्वाही किरण जाधव यांनी यावेळी दिली. याप्रसंगी संतोष जोशी, राघवेंद्र अणवेकर, सव्वाशेरी, कट्टी यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.