बनावट नोटा छापणाऱ्या टोळीच्या कोल्हापूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
कोल्हापूर, दिनांक 21 (प्रतिनिधी) : 500 आणि 100 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या चौघडीच्या कोल्हापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. चंद्रशेखर बाळासाहेब पाटील (वय 34, रा. कसबा तारळे, ता. राधानगरी), अभिजीत राजेंद्र पवार (वय 40, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर), दिग्विजय कृष्णात पाटील (वय 28, रा. जयभवानी तालमीसमोर, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) आणि संदीप बाळू कांबळे (वय 38, रा. आंबेडकर नगर, कळे, ता. पन्हाळा) अशी बनावट नोटा प्रकरणी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत.
या चौघडी कडून पोलिसांनी 4,45,900 रुपये किंमतीच्या 500 आणि 100 रुपयांच्या बनावट नोटा आणि बनावट नोटा छापण्याचे साहित्य जप्त केले आहे.
मिळालेल्या टिप्स वरून पोलिसांनी पन्हाळा तालुक्यातील कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील मरळी फाट्यावर सापळा रचून क्रमांक एमएच-09-डीएक्स- 8888 ही पांढऱ्या रंगाची हुंडाई कंपनीची क्रेटा कार अडवून तपासली असता त्यात बनावट नोटा आढळल्या. क्रेटा कारमधून बनावट नोटा नेणाऱ्या त्रिकुटाला ताब्यात घेऊन त्यांना खाक्या दाखवला असता त्यांनी आंबेडकर नगर, कळे, ता. पन्हाळा येथील एका घरात ह्या नोटा छापल्या जातात, अशी कबुली दिली.
त्रिकुटाने दिलेल्या माहितीनुसार कळे, आंबेडकर नगर येथील घरावर छापा टाकला असता तेथे 4,45,900 रुपये किंमतीच्या 500 आणि 100बनावट नोटा आणि नोटा छापण्याचे साहित्य आढळले. तेथून नोटा छापणाऱ्या संदीप बाळू कांबळे या 38 वर्षीय इसमास ताब्यात घेण्यात आले.
कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.